अब्दुल-बहांनी प्रकट केलेल्या प्रार्थना

मार्च २०२१

अब्दुल-बहांच्या स्वर्गारोहण शताब्दी स्मरणोत्सवानिमित्त विश्व न्याय मंदिराच्या संशोधन विभागाद्वारे संकलित केलेल्या काही प्रार्थना

[1]

तो ईश्वर आहे.

हे तू, जो त्या दिव्य स्थानाभोवती भक्तिभावाने प्रदक्षिणा घालतो, ज्याभोवती स्वर्गातील पवित्र आत्म्यांचा जमाव प्रदक्षिणा घालतो. एकमेव सत्य ईश्वराच्या उंबरठ्यावर कृतज्ञतेने नतमस्तक होऊन, हात उंचावून म्हण: हे तू प्रत्येक प्रेमी हृदयाच्या आकांक्षा स्वरूपा! हे तू प्रत्येक भ्रमित आत्म्याच्या मार्गदर्शका! तू ह्या दुबळ्या सेवकास तुझ्या अनंत आशिर्वादाने लाभान्वित केले असून ह्या असहाय्य व एकाकी जीवास तुझ्या नेतृत्त्वाखाली तुझ्या एकतेच्या उंबरठ्यापर्यंत पोहचवले आहेस. त्यांच्या सुकलेल्या ओठापर्यंत तू तुझ्या दयाळूतेच्या जीवनजलाचा पेला उंचावला आहेस आणि ह्या थकल्या आणि हिरमुसलेल्या जीवास स्वर्गिक कृपेमंद वायूलहरीने पुनरुज्जीवन प्रदान केले आहेस. तुझ्या अतीव कृपेच्या भागातून माझ्यावर उदंड मर्जी बहाल केल्याबद्दल आणि मला तुझा पवित्र उंबरठा साध्य केल्याबद्दल मी तुझा ऋणी आहे. मी तुझी नम्र विनवणी करतो की तुझ्या स्वर्गिक साम्राज्याच्या कृपांचा मला मोठा वाटा मिळू दे. मला तुझे सहाय्य दे. तुझ्या कृपेचा वरदहस्त माझ्यावर असू दे.

[2]

हे माझ्या अदृश्य मित्रा! हे तू इहलोक आणि परलोकातील आत्म्यांचा आकांक्षा स्वरूपा! हे तू दयाळू प्रेमी! हे सर्व असहाय्य आत्मे तुझ्या प्रेमामुळे मोहित झाले आहेत आणि हे दुबळे जीव तुझ्या उंबरठ्याचा आश्रय मिळवू इच्छितात. दररोज रात्री ते त्यांचा तुझ्यापासुन वियोगाचा विलाप करीत आहेत आणि रोज पहाटे घृणित हृदयांच्या व्यक्तींच्या हल्ल्यामुळे रूदन करत आहेत. प्रत्येक क्षणागणिक ते नव्या नव्या क्लेशाच्या सामोरे जात आहेत आणि प्रत्येक श्वासागणिक, क्रूर व जुलमी दमनकर्त्यांकरवी उत्पीडित होत आहेत. तुझा जयजयकार असो, की इतके सर्व सोसूनही ते अग्नी मंदिरासम तेवत राहिले आणि सूर्य-चंद्रा सारखे लक्ख चकाकत राहिले आहेत. प्रभूधर्माच्या विश्वासात ते मजबूत स्तंभासारखे ताठ उभे आहेत आणि निधड्या छातीच्या घोडेस्वाराप्रमाणे मैदानात उतरायची त्वरा करीत आहेत. ते सुवासिक फुलासारखे उमलले आहेत आणि आनंदमय गुलाबासारखे हर्शोल्लीत आहेत. म्हणून हे तू प्रेमळ पालनकर्त्या, तुझ्या साम्राज्यातून सुनिश्चित केलेली स्वर्गीय कृपा ह्या पवित्र आत्म्यांना बहाल करुन त्यांचे सहाय्य कर जेणेकरून महानतम स्वर्गातील उच्चतम सद्गगुणांचे प्रदर्शन हे आत्मे करतील. तू सर्व औदार्यशाली, दयनीय, सर्वदयाळू आणि एकमेव दयाघन आहेस.

[3]

हे तू अद्वितीय आणि प्रेमळ स्वामी! जरी मी असमर्थ आणि क्षमताहीन आहे, आणि तुझ्या मार्गातील घोर कष्ट आणि यातना असह्य आहेत, तरी पण आम्हासाठी शक्ती आणि सामर्थ्य तू सुनिश्चित केलेले आहेस. हे स्वामी, आम्हास सामर्थ्य आणि क्षमता प्रदान कर, जेणेकरून आम्ही महानतम दृढतेचे प्रदर्शन करू शकू; ह्या जगाचे व जगातील लोकांचे परित्याग करून आमच्या हृदयात तुझ्या प्रेमाची अग्नी पेटवून, मेणबत्ती प्रमाणे प्रज्वलित होऊन, भस्मसात करणाऱ्या ज्वाला प्रकट करून आपले तेजस्व पृथ्वीवर प्रकाशित करू शकू.

हे तू सर्व विश्वाचा एकमेव स्वामी! आम्हास ह्या मायावी, भ्रमित करणाऱ्या कपोल कल्पनांच्या जगातून मुक्त कर आणि अनंताच्या साम्राज्याकडे अग्रेसर कर. ह्या मिथ्या जगापासून मुक्त करण्यासाठी आम्हास शक्ती प्रदान कर आणि कृपाभावाने आम्हास स्वर्गीय साम्राज्याच्या देणग्यांचे आशिर्वाद मिळवून दे. या अगदी सत्य जगासारखे दिसणाऱ्या पण खोट्या अस्तित्वहीन जगाच्या मोहपाशातून आमची सुटका कर आणि आम्हाला अनंत-अमरत्व जीवन प्रदान कर. आम्हास सुख शांती, आनंद-हर्षोल्लास आणि संतुष्टी बहाल कर. आमच्या हृदयांना आराम, आत्म्यास सुख शांती व स्थिरचित्तता प्रदान कर, जेणेकरून जेव्हा आम्ही तुझ्या साम्राज्याकडे उर्ध्वगमन करू तेव्हा आम्हास तुझे सहचर्य लाभेल आणि उच्चतम स्वर्गातील अधिराज्यामध्ये उदंड उल्हासित होऊ. तू एकमेव दाता, वरदाता आणि सर्व शक्तीमान आहेस.

[4]

हे माझ्या शाश्वत प्रियतमा आणि माझ्या आराध्य मित्रा! कधीपर्यंत मी तुझ्या वियोगात तुझ्यापासून दूर राहाणार आणि तुझ्या सहचर्यापासून वंचित राहण्याची झळ कधीपर्यंत मी सोसणार? तुझ्या स्वर्गीय साम्राज्यातील शरणस्थळांकडे जाणारा मार्ग मला दाखव आणि तुझ्या उच्चतम साम्राज्याच्या प्रकटीकरणाच्या दृश्याच्या वेळी माझ्यावर प्रेमळ दयाळू कटाक्ष जरूर टाक.

हे सर्वसमर्थ स्वामी! माझी स्वर्गीय साम्राज्याच्या रहिवाश्यांमध्ये गणना कर! हे नाशवंत विश्व माझे तात्पुरते घर आहे, तुझ्या स्थानरहित साम्राज्यात मला निवासस्थान बहाल कर. मी या पृथ्वीतलावरचा रहिवासी आहे, तुझ्या वैभवशाली प्रकाशपुंजाचा तेजस्वी झोत माझ्यावर टाक. ह्या धुळीच्या जगात मी राहत आहे, मला तुझ्या स्वर्गीय साम्राज्याचा रहिवासी बनव, जेणेकरून मी माझे जीवन तुझ्या मार्गात समर्पित करू शकेन आणि माझ्या हृदयाची आकांक्षा पूर्ण करेन, स्वर्गीय कृपेचे किरीट माझ्या मस्तकावर सुशोभित होऊ दे, आणि "हे ईश्वराचे वैभव, महानतम वैभव!" या विजयघोषाचा नाद निनादू दे.

[5]

हे तू दयाळू स्वामी! हे एकत्र जमलेले आत्मे तुझे मित्र आहेत आणि तुझ्या प्रेमात मग्न आहेत. तुझ्या सौंदर्याच्या किरणांनी ते मंत्रमुग्ध झाले आहेत आणि तुझ्या कस्तुरीयुक्त सुगंधाच्या बटांनी आकृष्ट होऊन मोहित झाले आहेत. त्यांनी आपली हृदये तुला अर्पण केली आहेत, ते क्षुद्र आणि असहाय्य असून तुझ्या पावन मार्गात भरकटत आहेत. त्यांनी आपल्या आणि परक्या सर्वांचा त्याग केला आहे आणि तुझ्या एकतेची दोर घट्ट धरून तुझ्या आराधनेत तुझ्या समोर नतमस्तक आहेत.

ते ह्या निकृष्ट जगाशी संबंधित आहेत; त्यांचे तू तुझ्या साम्राज्यात स्वागत केलेस. ते छिन्नभिन्न अवस्थेत, सुकलेल्या, मृतप्राय वंचिततेच्या अवस्थेत रानात सुकलेल्या झुडुपासारखे आहेत; तू त्यांना तुझ्या ज्ञानाच्या आणि बुद्धीमत्तेच्या तुझ्या उद्यानातील वृक्षवल्ली बनवलेस. त्यांची वाचा बंद केली गेली होती; तुझ्यामुळे त्यांना वाचा फुटली आणि ते बोलण्यास पुढे सरसावले. ते चेतनाहीन झाले होते; तू त्यांना चैतन्यमय केलेस. ते करपलेल्या नापिक भूमीसारखे होते; तू त्यांना अंतर्गत अर्थमयाच्या गुलाबवाटीकेत परिवर्तित केले. ते मानवाच्या भौतिक जगातील बालक होते; तू त्यांना स्वर्गीय परिपक्वता मिळविण्यास समर्थ केलेस.

हे तू दयाळू परमेश्वरा! त्यांना तुझ्या सुरक्षिततेच्या छत्राखाली आश्रयस्थान आणि निवारा दे, आणि परीक्षा आणि संकटे यापासून त्यांचे संरक्षण कर. तुझ्या अदृश्य सहाय्याने त्यांचे मार्गदर्शन कर आणि तुझी विफल न होणारी अचूक कृपा त्यांना प्रदान कर.

हे तू दयाळू आणि प्रेमळ प्रियतमा! ते फक्त शरीरमात्र आहेत आणि तू आहेस जीवन चैतन्य. मानव शरीर आपला ताजेपणा आणि सौंदर्यासाठी चैतन्याच्या कृपेवर अवलंबून असते. म्हणून, ते तुझ्या पुष्टीचे गरजू, तुझ्या दारी उभे ठाकले आहेत आणि नूतन प्रकटीकरणाच्या काळात तुझ्या पवित्र चैतन्याच्या तारणकारक शक्तीची विनवणी करीत आहेत. तू सर्व समर्थ आहेस. तू एकमेव दाता, पालनकर्ता, वरदाता आणि क्षमाशील आहेस. स्वर्गातील अदृश्य अधिराज्यांतून तू तेजस्वीपणे चकाकत आहे.

[6]

हे स्वर्गीय सहाय्यकर्त्या! गुंतागुंतीची संकटे उद्भवली आहेत, भयानक विघ्ने उत्पन्न झाली आहेत. हे परमेश्वरा! ह्या संकटांचे निवारण कर आणि तुझ्या महानतेचे आणि शक्तीचे प्रत्यक्ष प्रमाण दे. ह्या कष्टांचे निराकरण कर आणि आमच्या असाध्य मार्गावरील खडतर वाट समतल आणि मृदुल कर. हे दैवी परिपूरक! हे अडथळे निगरगट्ट आहेत आणि आमचे कष्ट व कठीण परिस्थिती असंख्य प्रतिकूल परिस्थितीत एकत्र आले आहेत. तुझ्या व्यतिरिक्त कुणी मदतनीस नाही आणि तुझ्या व्यतिरिक्त कुणी तारणहार नाही. आमच्या सर्व आशा तुझ्यावरच आहेत आणि आमचे सर्व कार्यकलाप तुझ्या निगराणीत समर्पित आहेत. तूच आहेस मार्गदर्शक आणि सर्व संकटे दूर करणारा, आणि तूच आहेस सर्वसुज्ञ, सर्व द्रष्टा, आणि सर्व श्रवणकर्ता.

[7]

हे करुणाकरा! हे सर्वसमर्थ प्रभू! मी एक कमकुवत, दुर्बल, आणि असहाय सेवक आहे; परंतु मी तुझ्या कृपेच्या व अनुग्रहाच्या आश्रयात, तुझ्या ममतेच्या स्तनपानाने पोषित झालो आहे आणि तुझ्या करुणेच्या स्नेहल वक्षस्थलाने माझे पालनपोषण केले आहे. हे मम स्वामी! मी जरी गरजू आणि निर्धन असलो, तरी प्रत्येक गरजू तुझ्या कृपाप्रसादाने संपन्न होतो, तसेच प्रत्येक श्रीमंत जर तुला विमुख झाला तर तो गरीब व ओसाड बनतो.

हे स्वर्गीय सहाय्यकर्त्या! हे भारी ओझे सहन करण्यास मला शक्ती प्रदान कर व या तुझ्या महानतम देणगीचे रक्षण करण्यास मला समर्थ कर, कारण या संकटा व परीक्षा अतिशय बलवान आहेत आणि कसोट्यांचे हल्ले इतके भयावह आहेत की प्रत्येक पर्वत धूळात विखुरला आहे आणि आणि सर्वोच्च शिखर उध्वस्त होत आहेत. तुला संपूर्णपणे माहित आहे की माझ्या हृदयात तुझ्या स्मरणाव्यतिरिक्त आणि माझ्या मनात तुझ्या प्रेमाव्यतिरिक्त दुसऱ्या कशाचीही अभिलाषा नाही. तुझ्या प्रेमी जनांची सेवा करण्यास मला सशक्त कर आणि तुझ्या उंबरठ्याच्या सेवेत सतत मग्न होण्यासाठी मला प्रतिज्ञाबद्ध होऊ दे. तू प्रेमळ स्वामी आहेस. तू अनंत कृपांचा स्वामी आहेस.

[8]

हे स्वर्गीय सहाय्यकर्त्या! मला जागृत कर आणि मला चैतन्यमय कर. तुझ्या व्यतिरिक्त अन्य सर्व गोष्टींपासून मला अनासक्त कर आणि तुझ्या सौंदर्याच्या प्रेमाकडे मला आकर्षित कर. पवित्र चैतन्यमय श्वासांचे माझ्यावर स्फुरण कर आणि मला आभा साम्राज्याच्या आवाहनाला प्रतीसाद देण्यास भाग पाड. मला स्वर्गीय शक्ती प्रदान कर आणि माझ्या हृदयाच्या अत्यांतरिक गाभाऱ्यात चेतना दीप प्रदीप्त कर. मला सर्व बंधनातून मुक्त कर आणि सर्व आसक्तीपासून मुक्त कर, जेणेकरून मी तुझ्या शुभ-आनंदाशिवाय इतर कसलीही अभिलाषा ठेवणार नाही, तुझ्या मुखकमळाव्यतिरिक्त कसलीही अपेक्षा ठेवणार नाही आणि तुझ्या मार्गाशिवाय दुसऱ्या मार्गावर चालणार नाही. मला असे वरदान दे की मी दुर्लक्षित लोकांना जाणीव करून देईन आणि मानसिक निद्रामग्न असलेल्यांना जागृत करीन, तहानलेल्यांना जीवनजल प्राशन करवून तृप्त करीन आणि रोगाने विव्हळत असलेल्यांना स्वर्गीय रोगनिवारक औषधी मिळवून देईन.

मी जरी नम्र, हीन आणि निर्धन असलो तरी तू माझा एकमेव आश्रयस्थान आहेस, माझा आधार आहेस आणि माझा मदतगार आहेस. तू तुझे साह्य अशा चमत्कृतीपूर्ण रीतीने पाठव की सर्व हतबुद्ध होतील. हे परमेश्वरा! तू खरोखरच सर्वसमर्थ, सर्व शक्तिशाली, एकमेव दाता, औदार्यशाली आणि सर्वसाक्षी आहेस.

[9]

तो ईश्वर आहे.

हे ईश्वरा, माझ्या परमेश्वरा! मी माझा चेहरा तुझ्या मुखारविंदाकडे केंद्रित केला आहे आणि तुझ्या रोगनिवारक औषधीच्या सागरातून संजीवनीचा शिडकाव आमच्यावर करण्याची याचना करीत आहे. कृपामयतेने मला सहाय्य कर, हे‌ स्वामी, जेणेकरून तुझ्या लोकांची सेवा करण्यास व तुझ्या सेवकांचे रोगनिवारण करण्यास मी सक्षम होईल. जर तू मला मदत करशील तर जे काही उपाय मी देऊ करेन ते प्रत्येक रोगपीडेवर संजीवनीचे कार्य करेल, अत्यंत तहानलेल्यांसाठी जीवनदायी जलाचा झुळूक बनेल आणि दु:खितांच्या हृदयांवर सुखवणारे मलम बनेल. जर तू मला सहाय्य केले नाहीस तर दुसरे काहीही न होता त्रासच त्रास होईल आणि मी क्वचितच कोणत्याही आत्म्याचा उपचार करू शकेल.

हे ईश्वरा, माझ्या परमेश्वरा! तुझ्या शक्तिसामर्थ्याने रोग्यांचे उपचार करण्यास मला सहाय्य कर. तू खरोखरच, रोग उपचारक, रोगनिवारक, जो प्रत्येक वेदना आणि आजारपणाचा परिहारक आहे, तू तो आहेस ज्याचे सर्व वस्तूंवर वर्चस्व आहे.

[10]

हे परमस्वामी! तुझ्या कृपेचा आणि प्रेमळ दयाळूपणाचा, तुझी निगराणी आणि संरक्षणाचा, तुझे आश्रय आणि औदार्याचा मोठा वाटा मला प्रदान कर ज्यायोगे माझ्या जीवनाचे अंतिम दिन आरंभीच्या दिवसांपेक्षा खचितच निराळे असू शकतील आणि माझ्या आयुष्यातील अंतिम टप्प्यात तुझ्या विविध आशिर्वादांसाठी सिंहद्वार उघडले जाईल. तुझा प्रेमळ दयाळूपणा आणि आशिर्वाद प्रत्येक क्षणाला माझ्यावर झिरपू दे आणि तुझी क्षमाशीलता व कृपा माझ्या प्रत्येक श्वासागणिक उदारपणे देऊ कर, जेणेकरून तुझ्या उन्नत ध्वजाच्या छत्रछायेत मी सर्व प्रशंसिताच्या साम्राज्यात प्रवेश करू शकेन. तू वरदाता आणि सदासर्वदा प्रेमळ, आणि तू खरोखरच सर्व कृपांचा आणि वरदानांचा स्वामी आहेस.

[11]

हे तू पालनकर्ता, हे तू क्षमाकर्ता! एका महान आत्म्याने सत्याच्या साम्राज्यात उर्ध्वगमन केले आहे, आणि धूलीच्या मृत्युलोकातून वैभवाच्या अजर अमर साम्राज्याकडे पोहचण्याची त्वरा केली आहे. ह्या नुकत्याच पोहचलेल्या अतिथीस महान दर्जा प्राप्त करवून दे आणि या तुझ्या दीर्घकालीन सेवकास एका नूतन व भरजरी पोषाख परिधान करून सन्मानित कर.

हे तू अनुपमेय स्वामी! तुझी क्षमाशीलता आणि कोमल काळजी बहाल कर, जेणेकरून या आत्म्यास तुझ्या रहस्यमय विश्रामस्थानात प्रवेश मिळेल आणि तो तेजस्वी गणांच्या जिव्हाळ्याचा सहनिवासी बनू शकेल. तू आहेस एकमेव दाता, वरदाता, सदा प्रेम करणारा. तू क्षमाशील, तू कनवाळू आणि महाशक्तीशाली आहेस.

[12]

तो ईश्वर आहे.

हे तू क्षमाशील स्वामी! हे सेवक महान आत्मे होते, आणि ही दीप्तीमान हृदये तुझ्या मार्गदर्शनाच्या व ज्ञानाच्या प्रकाशाने ज्योतिर्मय बनली आहेत. तुझ्या प्रेम-अमृताचा काठोकाठ भरलेला पेला ह्यांनी आकंठ प्राशन केला आहे आणि तुझ्या सुमधुर ध्वनीलहरींच्या श्रवणाने त्यांनी अमरत्वाच्या राज्यातील तुझ्या अमर ज्ञानाची रहस्ये जाणली आहेत. त्यांनी आपली हृदये तुझ्या प्रेमपाशात बद्ध केली आहेत, परकेपणाच्या सांपळ्यापासून ते मुक्त झाले आहेत आणि तुझ्या एकतेच्या दोरीला घट्ट धरून आहेत. ह्या अनमोल आत्म्यांना स्वर्गातील रहिवाश्यांचे सोबती बनव आणि तुझ्या निवडक जनांच्या वर्तुळात ह्यांना स्थान मिळवून दे. उच्चस्थानीच्या अधिराज्यातील विश्रामस्थानी तुझ्या रहस्यांशी त्यांना सुपरिचित कर आणि तुझ्या दिव्य प्रकाशसागरात त्यांना डुंबव. तू वरदाता, ज्योतिर्मय आणि सर्वदयाळू आहेस.

[13]

हे स्वर्गीय सहाय्यकर्त्या! तुझ्या या उंबरठ्याच्या सेवकाच्या माता पित्यांना तुझ्या क्षमाशीलतेच्या सागरात डुंबव आणि प्रत्येक लहान-थोर कुकर्मापासून त्यांना पवित्र कर. तुझी क्षमाशीलता आणि दया त्यांना बहाल कर आणि त्यांच्यावर तुझे दयाळूमय वरदान प्रदान कर. तू खरोखरच, माफ करणारा, सदाक्षमाशील आणि अनंत आशिर्वादांचा प्रदाता आहेस. हे तू क्षमाशील स्वामी! आम्ही जरी पापी असलो तरी आमची आशा तुझे वचन आणि आश्वासनाकडे खिळली आहे. आम्ही चुकांच्या अंधकारात जरी लिप्त असलो तरी प्रत्येक वेळेला आम्ही आमचे मुखडे तुझ्या आशिर्वादित कृपेच्या अरुणोदयाकडे वळवले आहेत. तुझ्या उंबरठ्याला साजेल असा व्यवहार आमच्याशी कर आणि तुझ्या दरबाराला साजेल अशी मर्जी प्रदान कर. तू सदाक्षमाशील, माफ करणारा आणि आमच्या सर्व त्रुटींकडे दुर्लक्ष करणारा आहेस.

[14]

हे तू दयाळू प्रभू! सर्व प्रकारच्या सांसारिक आसक्तीपासून माझे हृदय शुद्ध कर आणि तुझ्या शुभसंदेशाच्या बंधनातून माझा आत्मा आनंदविभोर कर. मला मित्र आणि अनोळखी या दोन्हींपासून अनासक्त कर आणि तुझ्या प्रेमपाषात मला बंदिस्त कर जेणेकरून मी संपूर्णपणे तुला समर्पित होऊन आणि गर्विष्ठ अत्यानंदाने असा तल्लीन होऊन जाईन की तुझ्याशिवाय इतर कसलीही अभिलाषा ठेवणार नाही, तुझ्याशिवाय दुसरा ध्यास धरणार नाही, तुझ्या मार्गाशिवाय दुसरा मार्ग अवलंबणार नाही आणि फक्त तुझ्याशीच संवाद साधेन जेणेकरून मी जणु कोकिळ पक्षी होऊन तुझ्याच प्रेमात रात्रंदिवस मंत्रमुग्ध होऊन, उसासे सोडेन, विव्हळेन, काकुळतीने रडेन आणि चितकार करेन, “या बहा-उल-आभा!”

[15]

हे स्वामी! काय अद्भुत आशिर्वादांचा धबधबाच जणू तू आमच्यावर दयाळूपणे वर्षाव करीत आहेस आणि जणू काय ती मुबलक कृपेची देणगी तू आम्हास प्रदान केली आहेस! तू सर्व हृदयांना एकत्रित करून एका हृदयात परिवर्तित केलेस आणि सर्व आत्म्यांना एकत्रित करून एका आत्म्यात परिवर्तित केलेस. अक्रियाशील पिंडांना तू आयुष्यासह आणि भावनांनी परिपूर्ण केले आहेस आणि निर्जीव आकृत्यांना चेतनेच्या जीवन जलाने सजीव केलेस. सर्व दयाळूच्या दिननक्षत्राद्वारे उधळलेल्या ज्योतिर्पुंजाच्या तेजस्वी किरणांनी ह्या धूलीकणांना तू दृश्य जगातील अस्तित्व प्राप्त करवून दिले आणि एकतेच्या सागर तरंगांच्या शक्तीमुळे, शुल्लक जलबिंदूंना उधान आणून, घननाद करून उंचच्या उंच उसळी मारून सिंहनाद करण्यास सक्षम केलेस.

हे तू सर्व शक्तिमान प्रभू, जो गवताच्या एका क्षुल्लक पातीला डोंगराएवढे बळ प्रदान करू शकतोस आणि मातीच्या एका कणात चकाकणाऱ्या सूर्याची प्रखरता परावर्तित करू शकतोस! तुझी कोमळ दया आणि अनुग्रह आम्हांस प्रदान कर जेणेकरून पृथ्वीवरील लोकांसमोर लज्जित न होता आम्ही तुझ्या धर्मकार्याची सेवा करण्यास पुढाकार घेऊ.

[16]

हे तू सर्वसमर्थ स्वामी ! आम्ही सर्वजण तुझ्या सामर्थ्याच्या बळावर एकत्र जुडले आहोत. तू आमचा समर्थक आणि सहाय्यक आहेस. तुझी कोमल कृपा आम्हास प्रदान कर, आम्हास तुझे औदार्य दे, तुझ्या कृपेचे सिंहद्वार आमच्यासाठी खुले कर आणि तुझ्या कृपा कटाक्षाची नजर आमच्यावर टाक. तुझी स्वर्गीय झुळुक आम्हास स्पर्शून जाऊ दे आणि आमच्या उत्कंठीत हृदयांना अधिक गतिशील कर. आमचे नेत्र दीप्तीमान कर आणि आमच्या हृदयांचे शरणस्थळ असे तयार कर की त्याचा हेवा फुलांनी बहरून आलेले लताकुंज करतील. प्रत्येक आत्माला उल्हासित कर आणि प्रत्येक चैतन्यास आनंदित कर. तुझे पुरातन सामर्थ्य प्रकट कर आणि तुझी थोर शक्ति उघड कर. मानवी हृदयाच्या पक्ष्याला उंच उंच भरारी मारून उच्चतम आकाश गाठण्यास सक्षम कर आणि ह्या मिथ्या जगातील तुझ्या विश्वासूंना तुझ्या साम्राज्याच्या रहस्यांचे आकलन करण्यास समर्थ कर. आमची पावले दृढ कर आणि कधीही न डगमगणारी हृदये प्रदान कर. आम्ही पापी आहोत आणि तू सदा-क्षमाशील आहेस. आम्ही तुझे सेवक आणि तू आमचा परमोच्च स्वामी आहेस. आम्ही गृहहीन भटके आहोत आणि तू आमचा निवारा आणि आश्रयस्थान आहेस. आम्हास सशक्त कर जेणेकरून तुझ्या वाणीची गोड चव आणि तुझी वचने आम्ही उद्घोषित करु शकू. वंचितांचा आध्यात्मिक दर्जा प्रगत कर आणि रंजल्यागांजल्यांवर स्वर्गीय सामर्थ्य बहाल कर. अशक्तांना शक्ती आणि कमकुवतांना स्वर्गीय शक्ती प्रदान कर. तू पालनकर्ता, कृपाळू आणि तूच संपूर्ण वैश्विक वस्तूंवर अधिकार गाजवणारा स्वामी आहेस.

[17]

तो सर्व पवित्रम आणि सर्व तेजस्वी आहे.

दयाघन आणि कृपाळू परमेश्वराच्या नामाने! तुझा जयजयकार असो हे संपूर्ण ब्रह्मांडाच्या स्वामी!

हे स्वामी माझ्या ईश्वरा, माझा निवारा आणि माझे आश्रयस्थान! मी तुझा उल्लेख सार्थकरीतीने कशाप्रकारे करू शकेन, जरी सर्वाधिक आश्चर्यकारक आणि मौलिक शब्दांनी किंवा अति वैभवपूर्ण श्लोकांनी तरी, हे तू सर्वशक्तीशाली क्षमाशील प्रभो, जशी की मला जाणीव आहे की प्रत्येक उत्कृष्ट वक्त्याची जिव्हा तुझे गुणगान करतांना अडखळणारच, आणि तुझी प्रत्येक स्तुती व्यक्त करणारे जिव्हेतून बाहेर पडलेले शब्द असोत किंवा लेखणीतील शब्द असोत, तुझ्या सर्वसमर्थ शक्तीच्या चिन्हांचे वैभव प्रकट करण्याच्या प्रयत्नात, अथवा तुझ्याद्वारे उद्घ्रुत तुझ्या एकच शब्दाचे गुणगान करण्याच्या प्रयत्नात तोकडेच पडतात. अर्थातच मानवी मनांच्या पक्ष्याचे पंख, तु़झ्या दैवी पवित्रतेच्या परिसरात पोहचण्याच्या प्रयत्नात उंचच उंच भरारी मारताना विदीर्ण होतात आणि भ्रामक कल्पनेचे कोळी कितीही प्रयत्न करतील तरी तुझ्या ज्ञानाच्या छताच्या अत्युच्च शिखरांवर जाळे विणू शकत नाही. फक्त स्वत:ची दीनता हीनता स्वीकारावी आणि स्वत:च्या चुका मान्य कराव्यात याशिवाय माझ्यासाठी तर दुसरा पर्यायच उरत नाही, आणि दारिद्र्याच्या खोल गर्तेत एकाकी राहण्याशिवाय दुसरे निवासस्थान नाही. तुला समजू शकण्याची असमर्थता ही बुद्धीमत्तेचे सारतत्व आहे, आपल्या अवगुणांची स्वीकृती करणे तुझे सामिप्य साधण्याचे साधन असून, दारिद्र्याची स्वीकृती खरी संपत्ती अर्जनाचे साधन होय.

हे ईश्वरा! कृपाकरून मला आणि तुझ्या प्रामाणिक सेवकांना तुझ्या पवित्रतम उंबरठ्याच्या सेवा कार्यात मदत कर, तुझ्या स्वर्गीय पावित्र्यासाठी अनुनय करीत असता आम्हास सशक्त कर, आणि तुझ्या एकतेच्या द्वारासमक्ष विनम्र आणि समर्पित होण्यास आम्हास क्षमता प्रदान कर. हे माझ्या स्वामी, तुझ्या मार्गात माझी पावले दृढ कर आणि तुझ्या रहस्यांच्या स्वर्गातून प्रवाहित होणाऱ्या ज्वलंत किरणांनी माझे हृदय प्रकाशित कर. तुझ्या क्षमाशीलतेच्या आणि अभयदान देण्याच्या उच्चतम नंदनवनातून वाहणाऱ्या आवेशपूर्ण झुळूकांद्वारे माझी चेतना ताजीतवानी कर, आणि तुझ्या पवित्रतेच्या कुरणातून उत्पन्न झलेल्या पुनरूज्जीवित करणाऱ्या श्वासांद्वारे माझा आत्मा प्रफुल्लित कर. तुझ्या एकतेच्या क्षितिजावर माझा चेहरा झळाळू दे, आणि असे वरदान दे की तुझ्या सर्वांत नेक व प्रामाणिक सेवकांपैकी मी ओळखला जावा आणि तुझ्या मार्गात तुझे निवडक दास म्हणवले जाणाऱ्या दृढ आणि अविचल सेवकांत माझी गणना व्हावी.

[18]

हे स्वामी, माझ्या परमेश्वरा! आम्ही असहाय्य आहोत, तू शक्ती आणि बळाचा अधिष्ठाता आहेस. आम्ही तिरस्कृत आहोत, तू सर्वसमर्थ आणि सर्व वैभवशाली आहेस. आम्ही निर्धन आहोत, तू सर्वधारक आणि उदार आहेस. कृपामयतेने तुझ्या पवित्रतम उंबरठ्याची सेवा करण्यास आम्हास सहाय्य कर आणि तुझ्या शक्तीसंपन्न कृपेद्वारे तुझ्या गुणगानाच्या उद्गमस्थानी आराधना करण्यास आम्हास मदत कर. तुझा पवित्रतम सुवास तुझ्या प्राणीमात्रांपर्यंत पोहचवण्यास आम्हास समर्थ कर आणि तुझ्या सेवकांमध्ये तुझी सेवा करण्यासाठी आम्हास बळकट कर, ज्यायोगे तुझ्या महानतम नामापर्यंत आम्ही सर्व राष्ट्रांचे मार्गदर्शन करू आणि सर्व मानवमात्रांना तुझ्या एकतेच्या वैभवशाली सिंधूकाठी आणून पोहचवू.

हे स्वामी! जगातील मानवांच्या मोहापासून तसेच भूतकाळातील पापकृत्ये आणि पुढे येणाऱ्या यातनांपासून आम्हास मुक्त कर, जेणेकरून रात्रंदिवस तुझी वचने अधिकाधिक हर्षोल्लासाने आणि अधिकाधिक दीप्तीमानाने उद्घोषित करण्यास आम्ही उद्युक्त होऊ, ज्यायोगे आम्ही सर्व मानवांना दिव्य मार्गदर्शनाच्या दिशेकडे आमंत्रित करू आणि त्यांना सद्वर्तनाने वागण्यास प्रोत्साहित करू तसेच आम्ही या सर्व सृष्टीमध्ये तुझ्या एकतेच्या श्लोकांचे गान करू शकू. जे तू इच्छितोस ते करण्यास तू समर्थ आहेस. सत्यत: तू सर्वशक्तिशाली आणि सर्वबलशाली आहेस.

[19]

तो ईश्वर आहे.

हे तू दयाळू आणि परम प्रिय स्वामी! हे सर्व मित्र तुझ्या करारनाम्याच्या अमृतपानामुळे अतिआनंदित झाले आहेत आणि तुझ्या प्रेम वाळवंटात भटकत आहेत. तुझ्या विरहाच्या अग्नीने त्यांची हृदये होरपळून निघाली आहेत आणि ते मोठ्या आतुरतने तुझ्या वैभवशाली प्रकटीकरणाची वाट बघत आहेत. तुझ्या अदृष्य साम्राज्यातून, त्या अनावृत्त राज्यातून, तुझे ज्योति:पुंज स्वरूप त्यांच्यावर प्रकट कर आणि तुझ्या आशिर्वादाचे प्रकाशझोत त्यांच्यावर ओसांडू दे. प्रत्येक क्षणी एक नवीनतम आशीर्वाद दे आणि एक नवीन अनुकूलता प्रकट कर.

हे स्वर्गीय सहाय्यकर्त्या! आम्ही कमकुवत आहोत आणि तू सर्व शक्तिमान आहेस. आम्ही मुंग्यासम सूक्ष्म आणि तू वैभवशाली साम्राज्याचा राजाधिराज आहेस. तुझी कृपा आम्हास प्रदान कर आणि उदार देणगी बहाल कर, जेणेकरून आम्ही एक मशाल प्रज्वलित करून देश-प्रदेशात त्याचे प्रकाश पसरवू, तुझ्या शक्तीचे प्रदर्शन मानवमात्रास करून धर्मकार्यात सेवा अर्पण करू शकू. आम्हास वरदान दे की या अंधारलेल्या धरतीस आम्ही प्रकाशित करू शकू आणि क्षणभंगूर धुळीच्या या जगतात आध्यात्मिकता आणू शकू. आम्हास एका क्षणाचीही उसंत मिळू नये असा आशीर्वाद दे आणि ह्या जगातील अस्थिर गोष्टींनी आम्हास मलीन होऊ देऊ नकोस. तुझ्या प्रकटीकरणाच्या मार्गदर्शनाची मेजवानी देण्यास, आमच्या रक्ताच्या शाईने तुझ्या प्रेमाचे पोवाडे लिहिण्यास, भीति आणि संकटे पाठी सोडण्यास, फलदायी झाडाप्रमाणे आमचे रूपांतरण करण्यास आणि ह्या क्षणभंगुर जगात मानवी परिपूर्णता आणण्यास आम्हास सक्षम कर. खरोखरच तू औदार्यशाली, दयाघन, दयाळू आणि सदाक्षमाशील आहेस.

[20]

तो सर्व वैभवशाली आहे.

हे माझ्या स्वामी, माझा अधिपती, माझा राज्यकर्ता, आणि माझे सार्वभौम! माझ्या जिव्हेने, हृदयाने आणि आत्म्याने मी तुझे आवाहन करतो: ह्या तुझ्या सेवकावर काळजीपूर्ण जोपासनेचे आवरण घाल, तुझ्या अपार मदतीच्या वस्त्रांनी त्यांना सुशोभित कर आणि तुझ्या सुरक्षिततेच्या चिलखताने त्याचे रक्षण कर. तुझे गुणगान करण्यास आणि तुझे सदगुण तुझ्या भक्तांपर्यंत उघडकीस आणण्यास त्यांना सहाय्य कर, आणि तुझे पावित्र्य आणि एकतेचे पर्व साजरे करण्यासाठी जमलेल्या तुझ्या प्रत्येक सभेत तुझे वैभवगान व स्तुति करण्यास त्यांना मदत कर. सत्यत: तू शक्तिशाली, बलशाली, वैभवशाली आणि स्वयंभू आहेस.

[21]

हे तू दयाळू प्रभू, हे तू माझे हृदय आणि आत्म्याची आकांक्षा! तुझ्या या मित्रांना प्रेमळ दयाळुता बहाल कर आणि त्यांना तुझी अचूक कृपा प्रदान कर. तुझ्या उत्कट प्रेमिकांसाठी सांत्वनास्वरूप हो आणि जे तुझी सोबत इच्छितात त्यांच्यासाठी सुखद सोबती बन. त्यांची हृदये तुझ्या प्रेमाच्या अग्नीनी पेटली आहेत आणि त्यांची हृदये तुझ्या भक्तीच्या ज्वालांनी दग्ध होत आहेत. ते सर्व एकत्रित होऊन तुझ्या प्रेम वेदीवर पोहचण्याची त्वरा करीत आहेत जेणेकरून ते स्वखुशीने आपल्या जीवनाची आहूती देऊ शकतील.

हे स्वर्गीय सहाय्यकर्त्या! त्यांना तुझी मर्जी बहाल कर, त्यांचे योग्य मार्गदर्शन कर, कृपामयतेने त्यांना आध्यात्मिक विजय प्राप्त होऊ दे आणि त्यांना स्वर्गीय आशीर्वाद प्रदान कर. हे स्वामी, तुझ्या विशाल कृपेद्वारे त्यांना सहाय्य कर, तुझ्या ज्ञानाला वाहून घेतलेल्या सभांमधे त्यांचे दीप्तीमान चेहरे मार्गदर्शनाचे दीपक बनव आणि तुझ्या भक्तीपर सभेत जेथे तुझ्या वचनांचा अभ्यास होतो त्यांना तुझ्या स्वर्गीय वरदानाची चिन्हे बनव. तू सत्यत: दयानिधी, औदार्यशाली, आहेस, ज्याच्या सहाय्याची संपूर्ण मानवजात याचना करीत असते.

[22]

तो सर्व वैभवशाली, अत्याधिक दीप्तिमान ज्योती:पुंज आहे.

हे स्वर्गीय सहाय्यकर्त्या, हे तू क्षमाशील प्रभो! तुझ्या प्रशंसेत तुझ्या गुणगानाचे पोवाडे योग्यपणे मी कसा काय गाऊ शकेन किंवा तुझे गौरवगान व पूजाअर्चा कशी करू शकेन? तुझे वर्णन कुठल्याही शब्दांत आणि वाणीत केले तरी ते त्रुटीमय असणार आणि तुझे वर्णन कुठल्याही लेखणीने करणे म्हणजे असंभाव्य कठिण कार्य करण्यासारखी विवेकशून्यता ठरेल. जिव्हा म्हणजे घटकांना जोडून बनवलेलं एक यंत्रच आहे ज्याची वाचा व बोल ह्या अनायासे उत्पन्न झालेल्या विभूती आहेत. मग ज्याच्या समांतर किंवा साम्य असलेलं कुणी नाही अशा तुझी स्तुति मी पृथ्वीतलावरील यंत्राच्या सहाय्याने कशी करू शकेन! जे सर्व काही मी बोलू शकतो अथवा शोधू इच्छितो ते मानवी मनाच्या आणि मानवी जगाच्या आकलनशक्तीने मर्यादित आहे. मानवी विचार, दैवी पवित्रतेच्या शिखरापर्यंतची उंची कशी काय गाठू शकतील आणि भ्रामक विचारांचे कोळी कपोलकल्पनांचे जाळे पवित्रतेच्या अभयस्थानावर कसे विणू शकतील? मी माझ्या निर्बलतेची साक्ष आणि माझ्या अपयशाची कबुली देण्याशिवाय काहीही करू शकत नाही. तू खरोखरच सर्वधारक आणि दुर्गम आहेस, जो अज्ञानाने समजूतदारपणा घेतलेल्यांच्या आकलनापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे.

[23]

हे स्वर्गीय सहाय्यकर्त्या, तू सदाक्षमाशील आहेस! हे तू सर्वसमर्थ प्रभू, तू अनुग्रहशील आहेस! तुझ्या ह्या परमप्रिय सेवकास तुझ्या वैभवशाली अनुज्ञांच्या छत्रछायेत प्रतिबंधित ठेव आणि असे वरदान दे की, या एकाकी आणि हिरमुसलेल्या सेवकाची तुझ्या दयेच्या आवारात प्रगती व समृद्धी होईल. तुझ्या सहचर्याच्या प्रकटीकरणातून त्याला जीवन जलाचे पान करू दे आणि आशिर्वादित वटवृक्षाच्या सावलीत त्याला तुझ्या नियमांशी प्रतिबंधित राहू दे. तुझी उपस्थिती संपादित करण्याचा सन्मान त्याला प्रदान कर आणि त्याला चिरंतन आनंद दे. ह्या महान आत्म्याच्या अनुवंशिक आपत्यांना आपल्या प्रिय पित्याच्या पदचिन्हांवर मार्गक्रमण करण्यास सहाय्य कर, जेणेकरून संपूर्ण मानवजातीसमोर तो चरित्राचे चित्रण आपल्या वागणुकीत दर्शवेल, तुझ्याच मार्गाचे अनुकरण करेल, तुझ्या मर्जीत आनंदी होईल आणि तुझ्या नामाचा जयघोष करेल. तू सदासर्वदा प्रेमळ आणि अनेक औदार्याचा स्वामी आहेस.

[24]

हे तू अतुलनीय परमेश्वर! आम्ही तुझे विनम्र सेवक आहोत, आणि तू आहेस सर्व वैभवशाली. आम्ही पापी आहोत आणि तू सदासर्वदा क्षमाशील आहेस. आम्ही बंदिवान आहोत, गोरगरीब आहोत आणि तू आमचा आश्रयदाता आणि मदतगार आहेस. आम्ही मुंग्यासम सूक्ष्म आणि तू महावैभवशाली राजाधिराज, अत्युच्च सिंहासनावर विराजमान आहेस. तुझ्या दयेचे प्रतीक म्हणून आमचे रक्षण कर आणि तुझी कृपाळू काळजी आणि सहाय्य आमच्यापासून अडवून ठेवू नकोस. हे स्वामी! खरोखरच तुझ्या परीक्षा फार कठिण आहेत आणि तुझ्या सत्वपरीक्षा लोखंडाच्या पायांचाही भंग करु शकणारे आहेत. आम्हास जपून ठेव आणि सशक्त कर आणि आमची हृदये प्रफुल्लित कर. कृपामयतेने, अब्दुल-बहांसमान, आम्हास तुझ्या पवित्रतम उंबरठ्याची सेवा करण्यास सहाय्य कर.

[25]

तो ईश्वर आहे.

हे परमेश्वरा, माझ्या ईश्वरा! अति नम्रतेने आणि उत्साहाने, विनयशीलतेने आणि भक्तीभावाने, मी माझ्या जिव्हेने आणि हृदयाने, माझ्या चेतनेने आणि आत्म्याने, बुद्धिने आणि जाणिवेने विनवणी करतो की ह्या परिवाराच्या मनातील सर्वाधिक जोपासून ठेवलेल्या आकांक्षा पूर्ण कर, सर्वाधिक प्रशंसनीय कार्ये ते करतील असे नशीब प्रदान कर, परिपूर्णता आणि सन्मान, तुझी मर्जी आणि सौंदर्य, संपन्नता आणि मुक्ती ह्या परिवारासाठी आदेशित कर, ज्याने तुझ्या छत्रछायेच्या सावलीत आश्रय घेण्याची त्वरा तुझ्या प्रकाशमय उदयकाळी केली आहे, आणि तुझ्या सुरक्षित अभयस्थळी आणि बळकट किल्ल्यात आश्रय घेतला आहे. खरोखरच ह्या आत्म्यांनी तुझ्या हाकेला प्रतिसाद दिला आहे, तुझ्या उंबरठ्याकडे उन्मुख झाले आहेत, तुझ्या प्रेमाच्या अग्नीने उद्दीप्त झाले आहेत आहेत आणि तुझ्या पवित्र श्वासांनी ओढले गेले आहेत. ते सतत तुझ्या सेवेत कार्यरत होते, तुझ्या कृपाकटाक्षासमोर विनीत आणि तुझ्या आश्रयाच्या छत्रछायेत गुणवंत आहेत. तुझ्या लोकांमध्ये तुझ्या नामाचा निशाण उंचावणारे म्हणून ते सुप्रसिध्द आहेत आणि तुझ्या सेवकांत तुझ्या नामाचा उल्लेख करीत आहेत.

हे ईश्वरा, माझ्या परमेश्वरा! तुझ्या प्राचीन वैभवाने त्यांना गौरव प्रदान कर, तुझ्या भव्यतेच्या साम्राज्यात त्यांना सन्मानित कर आणि तुझ्या विशेष पारितोषिकांचा वर्षाव आजच्या महानदिनी त्यांच्यावर करून त्यांना सहाय्य कर. हे स्वामी, माझ्या ईश्वरा! त्यांचे निशाण वर उचलून धर आणि तुझ्या सुरक्षेचा विपुल वाटा त्यांना प्रदान कर, त्यांची चिन्हे जगभर प्रसारित कर आणि आणि त्यांचे तेज वृद्धिंगत कर जेणेकरून ते तुझ्या बहुगुणित आशिर्वादांच्या दीपकासाठी एक काच बनतील आणि ते तुझ्या प्रेमळ करुणेचे आणि वरदानांचे संवाहक बनतील.

हे स्वामी, माझ्या ईश्वरा! त्यांच्या एकाकीपणात तू त्यांचा सोबती हो आणि त्यांच्या दु:खाच्या क्षणात त्यांच्याभोवती तुझ्या सहाय्याचे मंडल घाल. तुझे पवित्र ग्रंथ त्यांना बहाल कर आणि तुझी उत्कृष्ट पारितोषिके आणि वरदानांचा विपुल वाटा त्यांना सुनिश्चित कर. खरोखरच तू सर्वसमर्थ, सर्वशक्तीशाली, कृपाळू, औदार्यशाली आणि सत्यत: तू दयाळू आणि दयाघन आहेस.

[26]

ज्याचे ज्ञान माझ्या अंतःकरणाने व अंतरात्म्याने स्वीकारले आहे अशा वरदानांनी संपन्न, कृपासिंधु स्वामी!

प्रातःकाळी माझे सांत्वन इतर कुणीही नसून तूच आहेस; माझे उत्कट ध्येय जाणणारा इतर कुणीही नसून तूच आहेस.

ज्या हृदयाने क्षणभरही तुझ्या नामाचा उल्लेख केला आहे, ते केवळ तुझ्यासाठी पीडा सहन करण्याची याचना करण्यावाचून इतर कोणत्याही औषधाची अपेक्षा करणार नाही.

जे हृदय तुझ्यासाठी उसासा टाकत नाही, ते कोमेजून जावो, आणि जे नेत्र तुझ्यासाठी अश्रू ढाळत नाहीत, ते अंधच असलेले बरे!

हे सामर्थ्याच्या स्वामी, माझ्या गहन विषण्णतेच्या समयी तुझ्या स्मरणाने माझे हृदय लख्ख प्रकाशित होते.

तुझ्या कृपादृष्टीतून तुझ्या चैतन्याने मला नवजीवन प्रदान कर जेणेकरून, जे पुर्वी कधीही अस्तित्वात नव्हते ते सदैव अस्तित्वात असेल.

हे वरदानांच्या स्वामी, आमचे गुणावगुण व योग्यता यांचा विचार न करता तुझ्या कृपावर्षावाचा विचार कर.

पंख तुटल्याने भरारी मंदावलेल्या या पक्ष्यांना, तुझ्या प्रेमळ दयेने नवीन पंख बहाल कर.

या विषयी अधिक माहिती

Back to Top