अब्दुल-बहा़ंची उद्धरणे

अब्दुल-बहांचे लेख व त्यांची वक्तव्ये त्यांच्या अर्धशतकापेक्षा जास्त काळाच्या मेहनतीचे फळ आहे. अब्दुल-बहा हे अवतार नव्हते आणि त्यांनी असा कधीच दावा केला नाही की त्यांना परमेश्वराकडून थेट प्रकटीकरण प्राप्त झाले होते. परंतु बहाउल्लाह यांनी आपल्या अनुयायांशी केलेल्या करारनाम्याचे केंद्रबिंदु, आणि नियुक्त केलेले बहाई प्रकटीकरणाचे विवरणकर्ते या नात्याने त्यांची लिखाणे बहाई पवित्र ग्रंथांचे विवरण करू शकतात आणि त्यामुळे त्यांची लिखाणे पवित्र लिखाणे ठरतात.

आतापर्यंत त्यांच्या सृजनात्मक रचना, ज्या पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेले साहित्य आहे, त्यात त्या़ंच्या व्यक्तिगत पत्रव्यवहाराचा, सर्वसाधरण पत्रांचा, विशिष्ट विषयांवरील विवरणे, पुस्तके, प्रार्थना, कविता, सार्वजनिक व्याख्याने आणि ध्वनिमुद्रित केलेली संभाषणे यांचा समावेश आहे. जे कुणी त्यांच्या संपर्कात येत त्यांनी त्यांच्या आगळ्या शैलीतील उत्कृष्टतेची आणि त्यांच्या वक्तृत्व प्रतिभेची प्रशंसा केली आहे.

‘त्यांचे शब्द सूर्यप्रकाशाइतके सोपे आणि सोबतच ते शब्द सूर्यप्रकाशासारखे ‌जागतिक आहेत....’

— योन नोगुची, जपानी लेखक

अब्दुल-बहांच्या पवित्र लिखाणातील व वक्तव्यातील काही निवडक वेचे खाली दिलेली आहेत.

“हे निर्विवाद व निश्चित आहे की मनुष्याचा निर्माता मनुष्यासारखा नाही कारण सामर्थ्यहीन प्राणी दुसऱ्या सजीवाला उत्पन्न करू शकत नाही. दुसऱ्यास घडविणारा व निर्माण करणारा, निर्माण करण्यासाठी सर्व पूर्णत्वाचा स्वामी असायला हवा…अनुषंगिक जग हे अपूर्णतेचे स्रोत आहे आणि  परमेश्वर पूर्णत्वाचा जनक आहे. परमेश्वराच्या पूर्णत्वाचा पुरावा प्रत्यक्षपणे या अनुषंगिक विश्वांतील अपूर्णतेतच आहे.”

(काही उत्तरीत प्रश्न)

“परमेश्वर एक आहे;  मानवजात एक आहे; सर्व धर्मांचा पाया ‌एक आहे. आपण त्या ईश्वराची  भक्ति करू या, त्याच्या सर्व अवतारांचे आणि प्रेषितांचे गुणगान करू या ज्यांनी त्या ईश्वराचा प्रकाश आणि वैभव प्रकटित केला आहे.”

(लंडनमध्ये अब्दुल-बहा)

“ईश्वराचे जे प्रेषित आहेत, ते जरी वरकरणी काहीही सामर्थ्य किंवा सौंदर्य न बाळगलेले आणि केवळ दरिद्री असले तरी, ते अत्यंत उच्च स्थानावरील व्यक्तिमत्व आहेत, निर्मितीमधील सर्वात उदात्त स्थान असलेले आहेत, ते दृश्य असोत किंवा अदृश्य असोत, ते निर्मितीचा आरंभ असोत व शेवट असोत, ते अत्यंत श्रेष्ठ  आहेत.”

(दैवी संस्कृतीची रहस्ये)

“परमेश्वरीय अवतारांची संकल्पना विश्वव्यापक असून ‌सर्वांना सामावून ‌घेणारी होती. त्यांनी प्रत्येकाच्या जीवनासाठी प्रयत्न केले आणि सार्वत्रिक शिक्षणाच्या सेवेत गुंतले. त्यांच्या कार्यकलापांचे क्षेत्र मर्यादित नव्हते- तर ते विस्तृत आणि सर्व समाविष्ट होते.”

(अब्दुल-बहांच्या लेखणीतील वेचलेली सुमने)

“दैवी धर्मांची स्थापना मानवतेच्या एकत्रीकरणासाठी आणि सार्वत्रिक शांतता प्रस्थापित करण्याच्या हेतूने केली गेली. कुठलीही चळवळ जी समाजात शांति आणि सामंजस्य आणते ती खऱ्या अर्थाने स्वर्गीय आहे; कुठलीही सुधारणा जी मानवांना एका छत्रछायेखाली एकत्र आणण्यास कारणीभूत होते ती नक्कीच स्वर्गीय शक्तिने उत्स्फूर्त व उद्देशाने संचलित आहे.”

(जागतिक शांततेचा प्रसार)

“आता नूतन युगाचे आगमन झाले आहे आणि सृष्टीचा पुनर्जन्म झाला आहे. मानवतेने नवजीवन धारण केले आहे. पानगळी निघून गेली आहे आणि पुनरुज्जीवन देणाऱ्या वसंत ऋतुचे आगमन झाले आहे. सर्व काही नवे नवे झाले आहे. कला आणि कारखाने पुनरुज्जीवित झाले आहेत, विज्ञानात नवीन शोध लागले आहेत, नवीन आविष्कार झाले आहेत; त्याचप्रमाणे मानवाच्या सर्व बाबींचे जसे की पोषाख आणि व्यक्तिगत गोष्टी –हत्यारे सुध्दा- हे सर्व नवीन झाले आहेत. सरकारी कायदा आणि पद्धती सुध्दा बदलली आहे. नूतनीकरण आजच्या युगाची आवश्यकता आहे.

आणि ह्या सर्व नाविन्याचे स्रोत स्वर्गातून होणाऱ्या कृपा आणि अनुग्रहाचा वर्षाव स्वर्गीय साम्राज्याच्या सम्राटाकडून होत आहे, ज्यांनी जगाचे नूतनीकरण केले आहे. म्हणून सर्व मानवांनी स्वत:ला सर्व जुन्या चालीरीतीपासून मुक्त करावे आणि नव्याचे स्वागत करावे ज्यामुळे नवीन पद्धतीवर पूर्णरूपेण लक्ष केंद्रित करता येईल, कारण तेच आजचा प्रकाश आणि आजच्या युगाची चेतना आहे.”

(अब्दुल-बहांच्या लेखणीतील वेचलेली सुमने)

“तो दिवस येत आहे जेव्हा जगातील सर्व धर्म एकत्र येतील, कारण तत्त्वविचारात ते आधीच एक आहेत. हे पाहून की केवळ बाह्य रूपेच ते वेगळे-निराळे दिसतात, त्यांचे विभाजन करणे उपयोगी नाही. मानवांच्या मुलांमध्ये काही आत्मे अज्ञानामुळे ग्रस्त आहेत, त्यांना आपण शिक्षण प्रदान करूया, काही लहान मुलांसारखी बालमने असतात ज्यांना ते  मोठे होईपर्यंत काळजी आणि शिक्षणाची आवश्यकता असते आणि काही लोक आजारी असतात,  त्यांच्याकडे आपण दिव्य औषधी घेऊन गेले पाहिजे.”

(पॅरिस येथील वक्तव्ये)

“प्रेम हा महानतम कायदा आहे जो या महाशक्तिशाली स्वर्गीय चक्रावर अधिकार गाजवतो, एक अद्वितीय शक्ति जी एकमेकास विरोधी व भिन्न भौतिक घटकांना एकत्र बांधून ठेवते, सर्वश्रेष्ट चुंबकीय शक्ति जी ब्रह्मांडातील हालचालींना निर्देशित करते.”

(अब्दुल-बहांच्या लेखणीतील वेचलेली सुमने)

“बहाउल्लाह यांनी ऐक्याचे एक वर्तुळ ओढले आहे, त्यांनी सर्व लोकांच्या एकीकरणासाठी आणि सार्वत्रिक ऐक्याच्या मंडपाच्या आश्रयाखाली त्या सर्वांना जमा होण्यासाठी एक आराखडा बनविला आहे. हे दैवी कृपेचे कार्य आहे आणि आपण सर्वांनी अंतःकरणाने व मनाने आपल्या मध्यभागी ऐक्याची वास्तवता लाभेपर्यंत प्रयत्न केला पाहिजे आणि आपण जसे काम करू, तशी आम्हास शक्ती प्रदान करण्यात येईल.

(पॅरिस येथील वक्तव्ये)

“बागेतील फुलांविषयी विचार करा. त्यांचे प्रकार, रंग, स्वरूप, आकार वेगवेगळा असला तरी ती एकाच झऱ्याच्या जलाने टवटवीत होतात, एकाच झुळुकीने त्यांना तजेला येतो, एकाच सूर्याच्या किरणांनी त्यांना पुष्टी येते आणि या त्यांच्या विविधतेनेच त्यांचे सौंदर्य तसेच त्यांची मोहकता वाढते. जर त्या बागेतील सर्व फुले आणि झाडे, पाने आणि मोहोर, फळे, फांद्या सर्व समान आकार आणि रंगाचे असतील तर डोळ्याला किती अप्रिय वाटतील! रंगांची विविधता, स्वरूप व आकार, यांची विविधता बागेला समृद्ध आणि सुशोभित करते आणि बागेची आकर्षकता वृद्धिंगत करते. अशाच प्रकारे, जेव्हा विचार, स्वभाव आणि चारित्र्याच्या विविध छटा, एका मध्यवर्ती प्राधिकरणाच्या शक्ती आणि प्रभावाखाली एकत्र आणल्या जातात, तेव्हा मानवी परिपूर्णतेचे सौंदर्य व वैभव उघड आणि प्रकट होईल. सर्व गोष्टी व्यापणाऱ्या व त्यांच्यावर अधिराज्य करणाऱ्या त्या परमेश्वराच्या दैवी प्रभावाखेरीज दुसरी कोणतीही शक्ती मानवजातीच्या भिन्नभिन्न विचारांना, भावनांना, कल्पनांना व मतांना एकसंध करण्यास सक्षम नाही.”

(दैवी योजनेच्या पत्रिका)

“प्रामाणिकपणा हा धर्मश्रद्धेचा मुख्य पाया आहे. याचा अर्थ असा आहे की धार्मिक व्यक्तीने स्वतःच्या व्यक्तिगत वासनांचा त्याग करावा आणि ज्या ज्या मार्गांनी सार्वजनिक हित साधले जाईल, त्या त्या मार्गांनी ते मनोभावे साधावे; कारण कोणत्याही मानवाला खऱ्या धार्मिक श्रद्धेवाचून, आपल्या स्वार्थी हितसंबंधापासून दूर जाणे आणि समाजाचे हित साधण्यासाठी स्वतःच्या हिताचा बळी देणे या गोष्टी कधीही शक्य होणार नाही.” 

(दैवी संस्कृतीची रहस्ये)

“जगाच्या अगदी हृदयस्थानी असलेली खरी संस्कृती आपला विजयध्वज तेव्हाच फडकवेल, जेव्हा काहीएक प्रख्यात आणि उच्च विचारांनी प्रेरीत झालेले सर्वश्रेष्ठ महापुरुष-जे निष्ठा आणि निश्चय यांची झळकती उदाहरणे आहेत-सार्वत्रिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि मानवजातीच्या भल्यासाठी आणि सुखासाठी निश्चयी मनाने आणि स्वच्छ वृत्तीने प्रयत्न करण्यास पुढाकार घेतील. त्यांनी शांतता हा विषय सर्वसामान्य चर्चेचा केला पाहिजे आणि आपल्या अखत्यारीतील शक्य त्या सर्व साधनांनी जगातील सर्व राष्ट्रांचा एक संघ निर्माण केला पाहिजे. त्यांनी सर्व राष्ट्रांसाठी एक बंधनकारक तह आणि करारनामा केला पाहिजे, ज्याच्या तरतुदी योग्य, निश्चित आणि अनुल्लंघनीय असतील.  त्यांनी तो सर्व जगात प्रसृत केला पाहिजे आणि मानवजातीची तिला मान्यता प्राप्त केली पाहिजे. पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व मानवांनी हा सर्वोच्च आणि उदात्त उपक्रम-जागतिक  शांती आणि कल्याणाचा वास्तविक स्त्रोत-एक पवित्र गोष्ट म्हणून स्वीकारला पाहिजे.”

(दैवी संस्कृतीची रहस्ये)

“मुलांचे शिक्षण व प्रशिक्षण हे मानवजातीच्या सर्वाधिक स्तुत्य कृत्यांपैकी एक आहे, आणि ते त्या सर्व-दयाळू परमेश्वराची कृपा व अनुग्रह उपयोगात आणते, कारण शिक्षण हा सर्व मानवी उत्कृष्टतेचा अत्यावश्यक पाया आहे व तो मानवाला चिरस्थायी वैभवाच्या शिखराकडे मार्गक्रमण करण्याची मुभा देतो.”

(अब्दुल-बहांच्या लेखणीतील वेचलेली सुमने)

या विषयी अधिक माहिती

Back to Top