अब्दुल-बहांचे जीवन

२२ मे, १८४४ च्या सायंकाळी मानवतेच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण घटना घडली. इराणमध्ये, शिराझ शहरात ‘महात्मा बाब’ यांनी एक नव्या वैश्विक धर्मचक्राच्या सुरूवातीची घोषणा केली.

त्याच सायंकाळच्या मध्यरात्री, तेहरानमध्ये, एका बालकाचा जन्म झाला. बहाउल्लाह यांनी आपल्या पित्याच्या सन्मानार्थ, आपल्या नवजात शिशूचे नाव, अब्बास एफेंदी ठेवले. पण कालांतराने अब्बास एफेंदी यांनी स्वत:ला ‘अब्दुल-बहा’ म्हणजे “बहाचे सेवक” म्हणून संबोधणे पसंत केले आणि ते मानवतेच्या सेवेच्या त्यांच्या जीवनाद्वारे, बहाउल्लाहांच्या शिकवणुकींचे एक जीवंत-मूर्त आदर्श म्हणून ओळखले जाऊ लागले.

प्रारंभिक जीवनकाळ

तरूण अब्दुल-बहा, त्यांच्या पित्याच्या एड्रिअनोपल‌ला ‌हद्दपारीच्या वेळी‌ काढलेला फोटो, १८६३-१८६८

अब्दुल-बहांचे बालपणाचे दिवस तोपर्यंत आनंददायी होते जोपर्यंत महात्मा बाब ह्यांच्या अनुयायांचा, ज्यात बहाल्लाह हे मुख्य अनुयायी होते, क्रूरतेने छळ करण्यात सुरूवात झाली नव्हती. बहाउल्लाह बाबी धर्माचे अनुयायी असल्यामुळे त्यांना झालेल्या तुरुंगवासामुळे त्या़ंच्या परिवाराला एक निर्णायक वळण मिळाले. बहाउल्लाह ह्यांना तुरूंगावासात बघत असतांना – जेथे त्यांचे केस आणि दाढी विस्कटलेली होती, जड पोलादी पट्ट्यांमुळे त्यांची मान सुजली होती, बेड्यांच्या वजनाने त्यांचे शरीर वाकले होते – ८ वर्षीय अब्दुल-बहांच्या मनावर कधी न विसरणारा परिणाम झाला होता.

डिसेंबर १८५२ मध्ये ४ महिन्यानंतर बहाउल्लाह यांची तुरूंगवासातून सुटका झाली आणि लगेचच त्यांना त्यांच्या कुटुंबासह इराणमधून हद्दपार करण्यात आले. ते सर्व त्यांच्या मातृभूमीला कधीच परत बघू शकणार नव्हते. बगदादला जात असतांना रस्त्यात अब्दुल-बहांना हिमबाधा झाली आणि सोबतच त्यांच्या शिशू भाऊ मेहदी पासून वियोगाचे दु:ख सोसावे लागले, जो आजारपणामुळे ती कठिण यात्रा करू शकला नाही.

बगदादला पोहोचल्यानंतर लगेचच अजून एक दु:खद वियोग उद्भवला जेव्हा २ वर्षासाठी बहाउल्लाह कुर्दिस्तानच्या डोंगरात विजनवासात गेले. आपल्या परमप्रिय पित्यापासून दूर असतांना अब्दुल-बहांनी आपला वेळ महात्मा बाब यांचे लिखाणावर चिंतन-मनन करण्यात घालवला.

बहाउल्लाह यांची सेवा

जेव्हा बहाउल्लाह त्यांच्या विजनवासातून परत आले तेव्हा १२ वर्षीय अब्दुल-बहांचे मन आनंदाने भारावून आले. त्यांच्या कोवळ्या वयातच त्यांनी आपल्या अंतर्दृष्टिने बहाउल्लाहांचे महानतम पद ओळखले होते. त्वरितच निकटच्या पुढील वर्षांत ते बहाउल्लाह यांचे प्रतिनिधी आणि सचिवही झाले.

अब्दुल-बहांनी, बहाउल्लाह यांच्यासाठी ढाल बनून, त्यांच्या सुरक्षिततेसाठी अशा लोकांच्या अनावश्यक हस्तक्षेपापासून लांब ठेवले जे त्यांचे खरे हितचिंतक नव्हते आणि ज्यामुळे त्यांना त्रास होऊ शकत होता. त्यांनी बहाई अनुयायांचाच नव्हे तर इतरांचाही सन्मान प्राप्त केला तसेच विद्वानांशी आणि बुद्धिमान व्यक्तींसोबत जे त्यांच्या मनात चालले होते त्या विषयावर वार्तालाप केला. किशोर‌ वयात त्यांनी एक भाष्य लिहिले जे त्यांचे भाषेवरील प्रभुत्व आणि सखोल ज्ञान दर्शविण्यास कारणीभूत ठरले. त्यांच्या हद्दपारीच्मा काळात अब्दुल-बहांनी सामाजिक अधिकारी वर्गाशी पत्रव्यवहार करण्याच्या जबाबदारीचे ओझेही वहन केले.

बहाउल्लाह यांच्या अक्का येथील हद्दपारीच्या ‌दरम्यान सुद्धा अब्दुल-बहा त्यांच्या पित्याचे रक्षण करत राहिले, बहाई अनुयायांची काळजी घेत राहिले, शहरातील गरीब व आजारी नागरिकांची काळजी घेत राहिले आणि कठोर हृदयी जेलर, घातक ‌पहारेकरी, आणि विरोधी अधिकारीही यांच्याशी व्यवहार करतांना न्यायाला धरून राहिले. अब्दुल-बहांच्या उदारतेने, नि:स्वार्थ सेवेने आणि सिद्धांताला धरून राहण्याने, जे कोणी त्यांच्या संपर्कात येत ते प्रभावित झाले आणि त्यामुळे थोड्याच दिवसात तीव्र घृणा करणाऱ्या शत्रूचेही हृदय परिवर्तन होऊन जात असे.

संविदेचे केंद्रबिंदू

बहाउल्लाह ह्यांनी आपल्या महानतम ‌पवित्र ग्रंथात त्यांच्या अनुयायांशी करारनामा स्थापित केला ‌आहे की त्यांच्या स्वर्गारोहणानंतर‌, त्यांच्या अनुयायांनी अब्दुल-बहांकडे मार्गदर्शनासाठी वळावे ज्यांचे त्यांनी “जिची परमेश्वराने योजना केली आहे त्या या पुरातन मुळापासून उत्पन्न झालेली शाखा” असे वर्णन केले. “संविदेचे केंद्रबिंदू” म्हणून अब्दुल-बहा यांचा अधिकार इतर ‌बहाई ग्रंथातही प्रस्थापित झाला होता. बहाउल्लाहांच्या मृत्युपत्रातही ही त्याचा समावेष आहे.

बहाउल्लाह यांच्या ‌स्वर्गारोहणानंतर, अब्दुल-बहांनी, त्यांच्या पित्याच्या धर्माचा प्रसार उत्तर अमेरिका आणि ‌युरोप‌सह अनेक नवीन देश-प्रांतात केला. त्यांच्याकडे पूर्व आणि पश्चिम भागातून नियमित तीर्थयात्र्यांचा प्रवाह त्यांना भेटण्यासाठी सुरु राहिला. त्यांनी बहाई मित्रांशी आणि संपूर्ण जगातील ‌जिज्ञासूंशी सविस्तर पत्रव्यवहार सुरु ठेवला आणि अक्कामध्ये आदर्श जनसेवकाचे जीवन जगले.

अब्दुल-बहांच्या वाढत्या ‌प्रभावामुळे ईर्शेने पेटलेला त्यांचा लहान सावत्र भाऊ मिर्झा मुहम्मद अली त्यांच्या अधिकाराला कमजोर करण्याचा आणि हडप करण्याचा प्रयत्न करू लागला. अशा रीतीने त्याने अधिकाऱ्यांच्या मनात अब्दुल-बहांच्या विरोधात विष कालवले आणि आधीच भडकलेल्या अधिकाऱ्यांच्या रोषास कारण मिळाले आणि काला़ंतराने शिथिल झालेले निर्बंध पुन्हा कडक झाले. ह्या प्रहारांनी अब्दुल-बहांना जरी भरपूर वेदना झाल्या तरी त्यांच्या निष्ठावंत अनुयायांमुळे, मुहम्मद अली त्यांना कायम स्वरूपाची क्षति पोहोचवण्यात असफल झाला आणि बहाई समाजात दुही किंवा बहाई धर्माच्या प्रसारात अवरोध उत्पन्न करू शकला नाही.

पाश्चिमात्य देशात प्रवास

१९०७ च्या सुरुवातीलाच अब्दुल-बहांनी आपल्या कुटुंबाला, अक्का पासून खाडीच्या पलिकडे हैफा येथे हलवण्यास सुरुवात केली होती, जेथे त्यांनी कार्मेल पर्वताच्या पायथ्याशी एक घर बांधले होते. १९०८ मध्ये ऑटोमन साम्राज्यात सुरू असलेला उपद्रव यंग तुर्क क्रांतीमुळे संपला. सुलतानने साम्राज्यातील सर्व धार्मिक आणि राजकीय कैद्यांची सुटका केली, ज्यामुळे दशकांच्या कैद आणि हद्दपारीनंतर अब्दुल-बहा स्वतंत्र झाले.

बऱ्याच अडचणी असून सुद्धा महात्मा बाब ह्यांच्या समाधीचे कार्य पुढे चालू राहिले, पर्वताच्या मध्यावर त्या ठिकाणी जे स्वत: बहाउल्लाहांनी निवडले होते. मार्च १९०९ मध्ये, अब्दुल-बहांनी बांधलेल्या समाधीत महात्मा बाब ह्यांचे अवशेष उदात्त समाधि-स्थळात स्थापित करू शकले.

पुढच्या वर्षी अब्दुल-बहांनी ‌इजिप्तला जाण्यासाठी हैफा सोडले, जेथे ते एक वर्ष राहिले आणि तेथे त्यांनी आपला वेळ राजदूत, बुद्धीवादी, धार्मिक नेते आणि पत्रकारांना भेटण्यात घालवला. उन्हाळ्याच्या शेवटच्या दिवसात १९११ मध्ये ते जहाजाने युरोपला गेले, आणि लंडनला जायच्या आधी फ्रान्स मध्ये थोनोन-लेस बेन्स या रिसोर्टवर थांबले.

१० सप्टेंबर १९११ रोजी सिटी टेंपल चर्चच्या व्यासपीठावरून अब्दुल-बहांनी आपल्या आयुष्यात प्रथमच सार्वजनिक सभेस संबोधिले. त्याच्याच पुढच्या महिन्यात इंग्लंडमध्ये एक महिन्याचे लांबलचक वास्तव्य अथक कार्यकलापांनी, बहाउल्लाहांच्या शिकवणींना पुढे वाढवण्यात आणि त्याद्वारे समकालीन लहान मोठ्या समस्यांचे समाधान करण्यात, सार्वजनिक सभेतील वक्तव्याद्वारे, पत्रकारांना भेटून, आणि व्यक्तिंना भेटून संभाषण साधण्यात भरलेले होते. लंडन मधील दिवस आणि मग पॅरिस, त्यामुळे एक प्रस्तुतीकरणाचा आराखाडा तयार झाला ज्याचा वापर ते आपल्या संपूर्ण यात्रांच्या दरम्यान करणार होते.

१९१२ च्या वसंत ऋतूत अब्दुल-बहांनी ९ महिने अमेरिका आणि कॅनडाची यात्रा केली. त्यांनी एका समुद्रतटापासून ते दुसऱ्या समुद्रतटापर्यंत प्रवास केला, ते सर्व प्रकारच्या श्रोत्यांना संबोधत करीत राहिले आणि सर्व दर्जाच्या व पदाच्या लोकांना भेटले. वर्षाच्या शेवटी १९१३ ला ते ब्रिटनला परतले, जेथून त्यांनी फ्रान्स, जर्मनी, हंगेरी आणि ऑस्ट्रिया या देशांचा प्रवास केला. शेवटी मे महिन्यात ते इजिप्तला परतले आणि ५ डिसेंबर १९१३ रोजी पवित्र भूमीला परत आले.

न्यूयॉर्क सिटीहून लिव्हरपूल, इंग्लंडकडे चाललेल्या “एस. एस. सेल्टिक” या जहाजावर अब्दुल-बहांची एक झलक, ५ डिसेंबर १९१२.
१९१२ मध्ये अब्दुल-बहा आणि त्यांचे प्रवासातील सोबती पॅरिसमधील आयफेल टॉवर खाली

अब्दुल-बहांच्या पाश्चिमात्य देशातील दौऱ्याने बहाउल्लाहांच्या शिकवणींचा प्रसार करण्यासाठी आणि युरोप व उत्तरी अमेरिकेत बहाई समुदायाची सुदृढ स्थापना करण्यासाठी बरेच महत्वाचे योगदान लाभले. युरोप आणि उत्तर अमेरीका या दोन्ही भूखंडात आधुनिक समाजाबद्दल चिंता करणाऱ्या, विश्वशांति, महिलांचे अधिकार, वांशिक समानता, समाज सुधार आणि नैतिक विकास ह्या विषयांसंबंधी चिंतित असणाऱ्या सर्व प्रकारच्या श्रोत्यांकडून त्यांचे मोठ्या प्रमाणावर प्रशंसात्मक स्वागत झाले.

अब्दुल-बहांच्या प्रवासांमध्ये संदेश असायचा-चिरप्रतिक्षित आणि प्रतिज्ञापित अशी संपूर्ण मानवतेच्या एकतेचे हे युग आहे ही घोषणा. ते सारखे म्हणायचे की शांति स्थापित करण्यासाठी सामाजिक अनुकूल परिस्थिती निर्माण करण्याची आणि आंतरराष्ट्रीय राजकीय उपकरणांच्या निर्मितीची गरज आहे. दोन वर्षांच्या आतच अब्दुल-बहांनी बजावलेले भाकित सत्यस्थितीत रूपांतरित झाले आणि जागतिक स्तरावर कलह पसरले.

महायुद्ध

२७ एप्रिल १९२० रोजी, अब्दुल-बहांना पहिल्या विश्व युद्धादरम्यान लोकांच्या सेवेच्या सन्मानार्थ आणि दुष्काळ निवारणासाठी, ब्रिटीश शासनाचे नाईटहुड (‘सर’) हे पद प्रदान करण्यात आले

जेव्हां‌ पहिले महायुद्ध सुरु झाले तेव्हा अब्दुल-बहांचे परदेशातील बहाई मित्रांशी संपर्क जवळजवळ बंदच झाले होते. युद्धाचा काळ त्यांनी, त्यांच्या जवळपासच्या लोकांच्या भौतिक आणि आध्यात्मिक गरजा भागवण्यात घालवला. हैफा आणि अक्का मध्ये ते व्यक्तिगतरीत्या कृषिसंबंधी कार्यशाला संचालित करत, त्यात सर्व धर्मातील गरीबांसाठी दुष्काळ टाळण्यासाठी उपाय योजना होत्या. पॅलेस्टाईनच्या लोकांच्या सेवेच्या सन्मानार्थ, ब्रिटिश साम्राज्याने अब्दुल-बहांना नाईटहुड (‘सर’) हे पद एप्रिल १९२० मध्ये प्रदान केले.

युद्धाच्या वर्षांत अब्दुल-बहांनी आपल्या कारकीर्दीतील अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यांपैकी एक कार्य केले: ते म्हणजे उत्तर अमेरिकेच्या बहाईंना उद्देशून लिहिलेल्या १४ दैवी योजनेच्या पत्रिका, ज्यात बहाई शिकवणी जगभर पसरवण्यासाठी गरजेचे असलेले आध्यात्मिक गुण आणि व्यवहारिक कृती त्यांनी निर्देशित केल्या.

शेवटची ‌वर्षे

त्यांच्या वृद्धा्वस्थेत अब्दुल-बहा असामान्यपणे ऊर्जापूर्ण होते. ते फक्त हैफातील बहाईंसाठी नव्हे तर आंतरराष्ट्रीय चळवळीत सामिल सर्व नागरिकांचे एक प्रेमळ पिता होते. त्यांच्या पत्रव्यवहारामुळे समुदायासाठी संघटनात्मक आराखाडा स्थापन करण्याच्या जागतिक प्रयत्नांना मार्गदर्शन केले. पवित्र भूमीत येणाऱ्या तीर्थयात्र्यांच्या सतत प्रवाहाशी त्यांनी केलेल्या संवादामुळे, जगभरातील श्रद्धावंतांना निर्देश आणि प्रोत्साहन मिळविण्यासाठी आणखी एक साधन प्राप्त झाले.

७७ वर्षांच्या वयात २८ नोव्हेंबर १९२१ मध्ये जेव्हा त्यांचे स्वर्गारोहण झाले, तेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेत अनेक धर्माच्या पार्श्वभूमीचे १०,००० शोकाकुल लोक सहभागी झाले होते. एका परप्रिय प्रशंसित व्यक्तिसाठी स्वयंस्फूर्तपणे श्रध्दांजली अर्पण करतांना, अब्दुल-बहा संपूर्ण मानवजातीस “सत्याच्या मार्गाकडे अग्रेसर करणारे नेता”, “एक शांति स्तंभ” आणि “परमेश्वराचे वैभव आणि महानतेचे मूर्तस्वरूप होते” असे गुणगान केले गेले.

अब्दुल-बहांचे अवशेष कार्मेल पर्वतावर महात्मा बाब यांच्या पवित्र समाधीतील एका भागात चिरशांतिसाठी स्थापित केले गेले.

हैफा येथे १९२१ मध्ये अब्दुल-बहांची अंत्ययात्रा.
अनेक धार्मिक पार्श्वभूमीचे दहा हजार लोक त्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले होते.
अब्दुल-बहांचे अवशेष कार्मेल पर्वतावर महात्मा बाब यांच्या पवित्र समाधीतील एका भागात चिरशांतिसाठी स्थापित केले गेले
अब्दुल-बहांच्या बांधकामाधीन पवित्र समाधी-स्थळाची रूपरेषा

या विषयी अधिक माहिती

Back to Top